मित्रांनो,

चांदण्यांनी खचून भरलेले आकाश, लुकलुकणारे तारे, दिव्यासारखा संथ प्रकाश देणारे मोजके ग्रह, वीजेची चंद्रकोर, मध्येच चमकून जाणारी उल्का, जलदगतीने सरकणारा कृत्रिम उपग्रह, एकाच जागी ठाण मांडून बसलेला ध्रुवतारा, अंधुक आणि लाजरा ध्रुवतारा शोधण्यासाठी मदत करणारे सप्तर्षी आणि अजून कितीतरी दृश्य - अदृश्य वस्तूंचा खजिना म्हणजे रात्रीच आकाश.

आकाश छंदाचं एक बरं आहे, आकाशच पाठ्यपुस्तक सर्वांसाठी खुल आणि ते सुद्धा मोफत. निरीक्षक कुठेही असला तरी एका विशिष्ट वेळी सर्वांना स्थूलमानाने तारकांची पार्श्वभूमी एकच. आपल्या महाराष्ट्रपुरत बोलायचे झाले तर भौगोलिक स्थानामुळे आकाश दृश्यात लक्षणीय फरक पडत नाही.

नभांगणाच्या या विलोभनीय दर्शनाने कितीतरी शब्द मनात गर्दी करतात. प्रकाशवर्ष, नक्षत्र, राशी, तेजोमेघ, आकाशगंगा, दीर्घिका शब्दांचा आणि त्यामागील नेमक्या अर्थाचा शोध घेतला तर लक्षात येते की यातलं रहस्य अजून आपल्याला उलघडायचे आहे. आकाश दर्शनातून खगोलाच्या प्रांतात शिरलात तर तेजस्विता, पॅरेलॅक्स, परमइनांतर, तिथी, अपसूर्य, वक्री, युती, प्रतियुती असे शब्द दिसायला लागले की गोंधळायला होते. हे कसा समजणार आपल्याला असा प्रश्न पडतो.

गोंधळू नका, छंद सोडण्याचा विचार करू नका. तुमच्यासाठी सोप्या भाषेत, आकृत्या, अॅनिमेशन, इ.सह असलेला, खास हौशी आकाश निरीक्षकांसाठी तयार केलेला एक अभ्यासक्रम आम्ही घेऊन आलो आहोत.

या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही पुढील गोष्टी पाहू/शिकू शकाल :
 1. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याचे स्थान कसे बदलते. या सूर्यस्थानावरच कोणत्या तारकांचे दर्शन होऊ शकेल ते ठरते.
 2. ग्रहांची अंतरे लक्षात ठेवणे किती सोपे आहे हे तुम्हाला बोडच्या नियमानुसार समजेल. यातूनच लघुग्रहांच्या शोधाची गोष्ट ही समजेल.
 3. सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भाने ग्रहाची सापेक्षस्थिती बदलत असते. यातूनच युती, प्रतियुती या संकल्पना कशा निर्माण झाल्या ते पहा. ग्रह दर्शनाशी याचा खूप जवळचा संबंध आहे. प्रकरण ३ प्रकरण ४ हे समजून घेता येईल.
 4. बुध आणि शुक्र ग्रह कधी पहाटे तर कधी संध्याकाळी दिसतात. शिवाय क्षितिजापासून ते जास्तीत जास्त किती उंचीवर दिसावेत हे कशामुळे ठरते हे समजून घेण्यासाठी प्रकरण ५ तुम्हाला उपयोगी पडेल.
 5. मंगळ, गुरु इ. बहिर्ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर ० ते ३६० यापैकी काहीही असू शकते. ग्रह दिसण्यासाठी कोणते अंतर अनुकूल असते? या घटनेस काय म्हणतात हे समजून घ्या प्रकरण ६ मध्ये.
 6. स्वतःच्या गतीमुळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतात. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर तारकांच्या पार्श्वभूमीवर हे सरकणे आपण पाहू शकू. पण काहीवेळा ग्रह पश्चिमेकडील तारकांच्या दिशेने सरकलेले दिसतात. ग्रह असे उलट दिशेने (reverse) कसे काय जातात हे प्रकरण ७ मधील अॅनिमेशनच्या सहाय्याने समजून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
 7. आपण आकाशात नजर टाकतो तेव्हा एखादा ग्रह/तारा कोठे आहे हे क्षितीजसंदर्भाने आपण समजावून घेतो. ग्रहाची नेमकी दिशा आणि जागा नेमकी कशी समजावून घ्यायची ते प्रकरण ८ मध्ये योग्य परिभाषेने जाणून घेता येईल.
 8. पृथ्वीवरील एखाद्या जागेचे स्थान आपण अक्षांश/रेखांश या पद्धतीने निश्चित करतो. आकाशगोल सपाट करून तारकांची जागा अशा तऱ्हेने सांगता येईल का? त्याची परिभाषा कोणती? हे समजावून घ्यायचे असल्यास तुम्हाला प्रकरण ९ ची मदत घ्यावी लागेल.
 9. ध्रुवतारा सगळ्यांना एकाच दिशेला म्हणजे उत्तरेला दिसतो. पण क्षितिजाच्या संदर्भाने वेगवेगळ्या निरीक्षकांना तो वेगवेगळ्या उंचीवर दिसतो असे का होते? प्रकरण १० मध्ये या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.
 10. सूर्य उन्हाळ्यात जास्त काळ आकाशात असतो तर हिवाळ्यात सूर्य लवकर मावळतो. दिनमान कमी असते. इतर ताऱ्यांबाबत असेच घडते का? हे रहस्य प्रकरण ११ मध्ये तुम्हाला नक्कीच उलगडेल.
 11. सूर्याचे स्थान समजले की कोणत्याही दिवशी, रात्री कोणत्याही वेळी कोणत्या राशी व नक्षत्रे तुम्हाला दिसतील. त्यातील पश्चिमेकडे कोणते तारे असतील? पूर्वक्षितिजावर कोणती नक्षत्रे, राशी उगवत असतील? हे प्रकरण १२ व १३ च्या सहाय्याने तुम्ही समजून घेतले की आकाश दर्शनाची किल्ली तुम्हाला सापडलीच म्हणून समजा.
चला तर मग उघडूयात हा आकाशाचा खजिना...
- हेमंत मोने        
(खगोल अभ्यासक)

नोंदणी पद्धत :
सध्या या कोर्स करिता नोंदणी मोफत आहे.

 1. http://era.mkcl.org/oer या website वर जा.
 2. तेथे “Register” या पर्यायावर क्लिक करा. नोंदणी अर्ज भरताना student/parent/teacher  यापैकी student हा पर्याय निवडा आणि तुमची माहिती भरा.
 3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदविलेले username आणि password वापरून तुम्ही लगेचच कोर्स बघू शकाल.
टीप : Course पाहण्यासाठी Internet Explorer या browser चा वापर करावा.